दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद; सहा महिन्यांत दुसरी घटना, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सक्षम भारत वार्ता
कामठी, ता.१३: शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरातून भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी लावलेली पाण्याची मोटार व वीजेच्या तारा चोरून नेल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. चोरीस गेलेल्या मोटारीची किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दोन चोरटे मोटार घेऊन जाताना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय परिसरात सध्या काही बांधकामे कंत्राटी पद्धतीने सुरू आहेत. या कामासाठी लावण्यात आलेली मोटार चोरीला गेल्याचे संबंधित कंत्राटदाराच्या निदर्शनास शुक्रवारी आले. त्यानंतर कंत्राटदाराच्या कंपनीने १३ नोव्हेंबर रोजी रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन चोरीची माहिती दिली. रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये ११ नोव्हेंबर रोजी दिवसाढवळ्या दोन युवक मोटार घेऊन जाताना दिसून आले. या फुटेजच्या आधारे जुनी कामठी पोलिसांकडून चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सहा महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी……..
विशेष म्हणजे, याच रुग्णालय परिसरातून सुमारे सहा महिन्यांपूर्वी १६ जून रोजीही पाण्याची मोटार चोरीला गेली होती. त्या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. आता पुन्हा त्याच ठिकाणी भरदिवसा चोरी झाल्याने रुग्णालय परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील चोरीचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच दुसरी घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
















